Join us

गणेश मंडळांना मोठा दिलासा! महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, वाचा नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 9:50 AM

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेनं यंदा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली.

मुंबई

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेनं यंदा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली. पण या सुविधेत मंडळांना एक हमीपत्र भरुन देणं बंधनकारक करण्यात आलं. या हमीपत्रातील काही अटींवरुन सार्वजनिक मंडळांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. हमीपत्रात चार फुटांपर्यंतची गणेशमूर्ती, शाडू आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट घातली गेली होती. त्यामुळे अनेक मोठ्या मंडळांच्या परवानग्या रखडल्या आहेत. आता रखडलेल्या परवानग्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण महापालिकेकडून हमीपत्रातील अटी मागे घेतल्या आहेत. नवीन हमीपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशमूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट काढण्यात आली आहे. 

हमीपत्रात काही दुरुस्ती आवश्यक असल्याने सुधारित हमीपत्र तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. नवीन हमीपत्रात मूर्तींच्या उंचीबाबत शिथिलता आणली गेली आहे. तसंच पर्यावरणपूरक मूर्तींची अटही काढण्यात आली. राज्य सरकारने १७ मेच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पीओपीची मूर्ती ठेवण्यास आक्षेप घेतला नसल्याचे बृहन्मंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले. त्यानुसार मुंबई मनपानेही हमीपत्रात आता बदल केले आहेत.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई