मुंबई - मुंबई महानगरपालिकेने राजीनामा न स्वीकारल्याने कोर्टात धाव घेणाऱ्या ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र ऋतुजा लटके यांना द्या, असे आदेश कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे अंधेरी पूर्व मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ रिक्त झाला होता. येथील रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या जागेवर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. मात्र मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या पालिकेतील राजीनाम्यावरून सुरू झालेला वाद कोर्टात पोहोचला होता. आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी लटके आणि पालिका प्रशासन अशा दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद झाले. त्यानंतर अखेर कोर्टाने ऋतुजा लटके यांना दिलासा देणारा निर्णय देताना मुंबई महानगपालिकेला त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले. तसेच राजीनामा स्वीकारल्याचे पत्र उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत देण्याची सूचनाही दिली.
ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा, हायकोर्टाने मुंबई मनपाला दिले राजीनामा स्वीकारण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 3:29 PM