मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी अखेर रवींद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेत तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यांसंबंधीचे आरोप केले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली होती.
याचबरोबर, रवींद्र वायकर यांच्या भूखंड घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राथमिक तपास करण्यात आला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे रवींद्र वायकर मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.