एकनाथ शिंदेंना नेमके काय झालेय? प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:58 PM2024-12-03T16:58:43+5:302024-12-03T16:58:57+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर गेल्याचे सांगितले जात आहे.

a big update on eknath shinde health what exactly happened an important information given by the doctor | एकनाथ शिंदेंना नेमके काय झालेय? प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

एकनाथ शिंदेंना नेमके काय झालेय? प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरी महायुतीला मुख्यमंत्र्यांची निवड करून नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आजारी आहेत. 

महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. यातच महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली होत नसल्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचा मुख्यमंत्री करण्याला पाठिंबा असल्याचे सांगत मार्ग मोकळा करून दिला. यावरूनही अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी निघून गेले. त्यातच गावी असतानाच एकनाथ शिंदे आजारी असल्याचे समोर आले. एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करत भेटीही टाळल्या. गावी दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ठाणे येथील घरी परतले. परंतु, एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदे यांना दाखल करून तपासण्या करण्यात आल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांना घरी सोडण्यात आले. ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

एकनाथ शिंदेंना नेमके काय झालेय? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हेही सोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत बोलताना डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यासोबतच त्यांचा घशाचा संसर्ग झाला होता. त्याच्या काही चाचण्या करण्यासाठी ते रुग्णालयात आले होते. त्याचा एमआरआय, एक्स रे करण्यात आला. त्यांना थोडा अशक्तपणा आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत. आम्ही रिपोर्टमध्ये काय हे सांगू शकत नाही. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ते काम करु शकतात. ते कामासाठीच गेले आहेत, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले. माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दिली.

दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? किती आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध होणार? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीची बैठक होणार नसल्याने अनुत्तरित राहत आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
 

Web Title: a big update on eknath shinde health what exactly happened an important information given by the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.