Join us

विमानतळावर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा काॅल निघाला खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:52 AM

दहावी नापास तरुणाचा कारनामा; पाँडिचेरीतून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबई आणि दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळावर बॉम्बस्फोट अथवा मोठा घातपात घडविण्यात येणार असल्याचा दूरध्वनी शुक्रवारी दुपारी हरयाणा पोलिसांना आला. त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना कळवले. मात्र, तपासात काहीही आढळून आले नाही. अखेर, पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पाँडिचेरीतून अटक केली. तो दहावी नापास असून, मनोरुग्ण असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या दूरध्वनीची माहिती हरयाणातील उद्योगविहार गुरुग्राम पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत मुंबई विमानतळावरील सर्व यंत्रणांसह मुंबईतील स्थानिक पोलिस ठाणी व गुन्हे शाखेला अलर्ट दिला. तसेच विमानतळासह परिसरात तपासणी केली, मात्र संशयास्पद असे काहीच आढळले नाही. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.   सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गोवीलकर, पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुशांत बावचकर, शैलेश माने, सागर गायकवाड यांनी सीडीआर लोकेशननुसार, दूरध्वनी करणारी व्यक्ती पाँडिचेरी येथे असल्याचे समजताच तेथील पोलिसांनी धाव घेत १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. 

आणखी एका कॉलची भर विमानतळावरील बॉम्ब कॉलच्या तपासातून सुटका होत नाही तोच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारी आणखी एका कॉलची भर पडली. कॉलधारकाने ट्रेनमध्ये बॉम्बहल्ला होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर, कॉल घेणे बंद केले. पोलिसांनी या कॉलरला विलेपार्लेतून अटक केली. सागर मुखिया असे त्याचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. 

टॅग्स :स्फोटके