विमानतळावर निळ्या बॅगमध्ये ठेवलाय बॉम्ब; निनावी कॉलमुळे धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:58 AM2023-09-25T09:58:40+5:302023-09-25T09:59:00+5:30
निनावी कॉलमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ (टी २)वर एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा इशारा देणारा निनावी कॉल शनिवारी आला. या कॉलमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब शोधमोहीम राबवली. मात्र, विमानतळ परिसरात काहीही संशयास्पद आढळले नाही. सहारा पोलिस, गुन्हे प्रकटीरण शाखेची पथके कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
टी २ येथील अधिकाऱ्यांना शनिवारी संध्याकाळी ६ वाजता विमानतळावरील निळ्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष व विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना माहिती दिली. श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने विमानतळावरील संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्यांना काहीही आढळले नाही. त्यामुळे कॉल खोडसाळपणा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवामुळे कडक बंदोबस्त
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे संपूर्ण मुंबईत उच्च सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, प्रमुख रेल्वे-बस-मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक क्षेत्रांभोवती पोलिसांनी सुरक्षाकडे उभारले आहे.
शहर पोलिसांचे ३५ हजार कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दल आणि इतर सुरक्षा एजन्सींचे अतिरिक्त सुरक्षा कर्मचारीही यात सामील असून फोर्स १ सारख्या कमांडो तुकड्याही सज्ज आहेत.