Join us

गणेशोत्सवाबाबत माहिती देणारी पुस्तिका; आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 2:40 PM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या जनसंपर्क विभागातर्फे निर्मित ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२२’ चे प्रकाशन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार यंदा देखील या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आणि उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या यंदाच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगी अर्जाचा नमुना, विविध मार्गदर्शक सूचना, या संदर्भात निर्गमित केलेले परिपत्रक, महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचे परिपत्रक, गणेशोत्सवात जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, महानगरपालिकेचे व इतर महत्त्वाचे नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, कृत्रिम विसर्जन तलावांची विभागवार यादी, सण आणि समारंभांसाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश या पुस्तिकेत आहे. त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सव हा कोविड साथ रोगावरील नियंत्रणानंतरच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने, यंदा दोन वर्षांनी पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे हे ३३ वे वर्ष असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना आणि स्पर्धेचे नियम देखील या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

कोविड हा साथ रोग नियंत्रणात जरी आला असला, तरी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कोविड विषयक नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. या पुस्तिकेचे मुद्रण हे बृहन्मुंबई महानगरपालिका मुद्रणालयाद्वारे करण्यात आले आहे. लवकरच ही पुस्तिका महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई महानगरपालिका