Health: मधुमेहींसाठी वरदान... १०१ वर्षांचे इन्सुलिन
By संतोष आंधळे | Published: November 14, 2022 12:18 PM2022-11-14T12:18:29+5:302022-11-14T12:19:06+5:30
Diabetics: मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रित राहत नाही अशा व्यक्ती इन्सुलिन हार्मोन घेतात. मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या इन्सुलिनचा शोध लागून १०१ वर्षे झाली आहेत.
- संतोष आंधळे
मुंबई : मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रित राहत नाही अशा व्यक्ती इन्सुलिन हार्मोन घेतात. मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या इन्सुलिनचा शोध लागून १०१ वर्षे झाली आहेत.
१९२१ साली कॅनेडियन संशोधक फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट या दोन शास्त्रज्ञांनी इन्सुलिन हार्मोनचा शोध लावला. त्यानंतर १०१ वर्षांत इन्सुलिन घेण्याच्या त्याच्या डोसेजच्या प्रमाणात आमूलाग्र बदल झाले आहेत. इन्सुलिनवर रुग्ण गेला की, तो रुग्ण गंभीर झाल्याचा लोकांमध्ये समज असायचा. मात्र, सध्याच्या नवीन बदलामुळे रुग्ण दररोज इन्सुलिन घेऊन सर्वसामान्यसारखे आयुष्य जगत आहेत.
भारतात टाईप १ डायबेटिसचे प्रमाण लक्षात घेतले तर सरासरी ३० ते ४० मुले लाखात सापडतात. या रुग्णांच्या स्वादुपिंडात इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया थांबलेली असते. याकरिता त्यांना बाहेरून इन्सुलिन घ्यावे लागते. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये स्वादुपिंडात इन्सुलिन तयार आणि ते रक्तातील साखर नियंत्रित करायला मदत करत असते. इन्सुलिन हे स्वादुपिंडातील बीटा पेशींमध्ये तयार होत असते. तसेच आवश्यकतेनुसार रक्तात सोडले जाते. टाइप-२ डायबेटिसमध्ये औषधे दिल्यास ती बीटा पेशींपर्यंत पोहोचतात. परिणामी, काही काळासाठी इन्सुलिनचे प्रमाण वाढते.
इन्सुलिनच्या शोधानंतर मोठे बदल झाले आहेत. इन्सुलिन घेण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत, इंजेक्शन, पेन, पंप याच्यापुढे जाऊन आता ॲडव्हान्स हायब्रीड क्लोज लूप डिवाइस हे नवीन उपकरण आले असून हे २४ तास तुमच्या शरीराला लावलेला असते. यामध्ये त्या मशीनद्वारे शरीरात साखरेचे प्रमाण किती आहे ते ठरविले जाते आणि त्यानुसार शरीराला त्या प्रमाणात इन्सुलिन दिले जाते. या अशा पद्धतीची २००-२२५ उपकरणे सध्या भारतात रुग्णाकडे आहेत. त्यामुळे इन्सुलिन सहज पद्धतीने देण्याची पद्धत अधिक सुलभ होत चालली आहे.
- डॉ. अभिषेक कुलकर्णी, हार्मोन्सतज्ज्ञ, सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल.
इन्सुलिन हे मधुमेही रुग्णांसाठी मोठे वरदान आहे. त्याच्यामुळे मधुमेही रुग्णाच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल झाले आहेत. विशेष करून टाईप १ डायबेटिसच्या रुग्णांना इन्सुलिनची गरज मोठया प्रमाणावर भासते. ते पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असतात. इन्सुलिनचा आविष्कार होण्यापूर्वी अशा रुग्णांचे खूप हाल होत असतात. त्यांना उपाशी ठेवले जायचे, कोणताही पदार्थ खायला दिला जात नसायचा. मात्र, या इन्सुलिनच्या शोधामुळे जेवणापूर्वी इन्सुलिनचा डॉक्टरांनी प्रमाणित करून दिलेला डोस अगदी सहजपणे स्वतः घेता येतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- डॉ. प्रशांत पाटील,
हार्मोन्स तज्ज्ञ, एसआरसीसी चिल्ड्रेन हॉस्पिटल, हाजी अली.