वैद्यकीय शिक्षणाला बूस्टर डोस; चार हजार कोटींचा निधी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 07:44 AM2023-02-25T07:44:18+5:302023-02-25T07:44:36+5:30
नियोजनासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आली होती.
मुंबई - राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीसाठी, तसेच वैद्यकीय शिक्षणात अत्याधुनिक बदल करण्यासाठी आशियाई विकास बँकेमार्फत ४,१०० कोटी इतका निधी मिळविण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात बँकेतील अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची सकारात्मक बैठक नुकतीच झाली. निधी नियोजनासाठी वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, काही जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तसेच आणखी काही जिल्ह्यांत महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन आहे. चार हजार कोटींच्या निधीतून मुख्यत्वे राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण, रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस), तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उमेदवार भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत (एमपीएससी) स्वतंत्र कक्षाची स्थापना करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
या प्रकरणी ३० जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव आणि आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झाली, तसेच संबंधित वैद्यकीय प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला असून, यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी असून, अकरा जणांची समिती तयार करण्यात आली आहे.