डोक्यात दगड पडून मुलगा झाला जखमी; अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:16 PM2023-08-04T13:16:16+5:302023-08-04T13:16:38+5:30
याप्रकरणी वडील राजाराम (वय ५०) यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात एका शाळा इमारतीचे दुरुस्ती काम सुरू असताना दगड डोक्यात पडून अथर्व कुळमेथे (वय १३) हा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी वडील राजाराम (वय ५०) यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लिट्ल फ्लॉवर स्कूल या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. राजाराम आणि त्यांचा मुलगा अथर्व ११ जून रोजी संध्याकाळी शाळेच्या जवळून चालले होते. इतक्यात इमारतीवरून काही दगड खाली पडले. त्यातील काही दगड अथर्वच्या अंगावर आलेत.
अथर्वच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. वडिलांनी तातडीने मुलाला स्थानिक नर्सिंग होममध्ये उपचाराकरिता नेले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यावर डॉक्टरांनी अथर्वला अन्य रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्याला होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अतिदक्षता विभागात त्याच्या जखमेवर टाके घालण्यात आले आहेत.
दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल
राजाराम यांनी १४ जून रोजी त्यांनी शाळा प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाविरोधात अंधेरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी जवळपास दोन महिन्यांनंतर म्हणजे २ ऑगस्ट रोजी याप्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम ३३७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास सुरू आहे.