सिंगापूरला गेलेल्या मुलाचा रेस्टॉरंटच्या १०व्या मजल्यावरून पडून मृत्यू, ढकलल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:29 PM2023-05-16T15:29:08+5:302023-05-16T15:30:17+5:30
सोहम चारकोपच्या सेक्टर ८ येथील सिद्धी हाईट्स येथे कुटुंबासह राहत होता. सिंगापूर येथील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात सोहम गाढ झोपेत चालत असल्याचे दिसून आले.
मुंबई: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी सिंगापूरला फिरायला गेलेल्या कांदिवलीतील १४ वर्षांच्या मुलाचा तिथल्या रेस्टॉरंटच्या १०व्या मजल्यावरून चुकून खाली पडून मृत्यू झाला. या मुलाचे नाव सोहम दीपक कदम असे आहे.
सोहम चारकोपच्या सेक्टर ८ येथील सिद्धी हाईट्स येथे कुटुंबासह राहत होता. सिंगापूर येथील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात सोहम गाढ झोपेत चालत असल्याचे दिसून आले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता आलिशान हॉटेलमध्ये घडली. कदम कुटुंबीय २५ एप्रिल रोजी सिंगापूरला गेले होते.
त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमने ३० एप्रिल रोजी रात्रीचे जेवण केले आणि त्याला खूप ताप आला होता. रेस्टॉरंटच्या १० व्या मजल्यावर त्यांची तीन बेडरूमची खोली असल्याने तो त्याच्या बेडरूममध्ये झोपायला गेला होता. सोहमची तब्येत बरी नव्हती आणि रात्री ११.३० च्या सुमारास ताप आल्याने त्याला जाग आली आणि तो चालायला लागला. तो बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर गेला. तो बाल्कनीच्या कोपऱ्याजवळ पोहोचला. बाल्कनीची उंची त्याच्या गुडघ्यापर्यंत होती. त्याने बाल्कनीच्या कोपऱ्यात बसण्याचा प्रयत्न केला मात्र झोपेत असल्याने चुकून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.
ढकलल्याचा संशय -
सोहमच्या आईवडिलांना त्याला कोणीतरी वरून ढकलल्याचा संशय होता. तेव्हा त्यांनी हॉटेलच्या आजूबाजूला बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात सोहम हा गाढ झोपेत असल्याचे आढळले. तो बाल्कनीच्या कोपऱ्यावर बसण्याचा प्रयत्न करत असताना १० व्या मजल्यावरून खाली पडल्याचेही त्यात स्पष्ट झाले. गेले दोन आठवडे सोहमचा मृतदेह सिंगापूरवरून मुंबईला नेण्यासाठी त्याचे कुटुंबीय धडपडत होते. अखेर चारकोप पोलिसांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला.