ड्रग्जच्या तस्करीतून बांधला बंगला, रो हाऊस, चौघांच्या तीन कोटींच्या मालमत्तेवर टाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:00 PM2023-12-01T13:00:22+5:302023-12-01T13:03:07+5:30
Crime News: युवा पिढीला नशेच्या आहारी ढकलणाऱ्या ड्रग्जच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या चौघांच्या मालमत्तांवर पोलिसांनी नुकतीच टाच आणली. या चौघांकडे सापडलेली मालमत्ता पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली.
मुंबई - युवा पिढीला नशेच्या आहारी ढकलणाऱ्या ड्रग्जच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या चौघांच्या मालमत्तांवर पोलिसांनी नुकतीच टाच आणली. या चौघांकडे सापडलेली मालमत्ता पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली. चार तस्करांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी बंगले, रो हाऊस खरेदी केल्याचे कारवाईतून उघडकीस आले.
ड्रग्ज विक्री करून तस्करांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने १६ ऑगस्ट रोजी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत एमडी आणि चरसचा साठा जप्त केला. या गुन्ह्यात आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली आहे. साहिल खान ऊर्फ मस्सा (२७), मोहमद शेख (४५), शमसुद्दीन शहा (२२), इमरान पठाण (३७), मोहमद मन्सुरी (२७), मोहमद सिद्दिकी (२४), सर्फराज खान (३६), रईस कुरेशी (३८), प्रियंका कारकौर (२४), कायनात खान (२८), सईद शेख (३०) आणि अली मिर्झा (३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ड्रग्ज तस्करीवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे, तपास अधिकारी हणमंत ननावरे आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.
कोणाकडे काय?
साहिल मस्सा : याच्याकडे मालेगाव, नाशिक येथील एक फार्म हाऊस, शिळफाटा येथील फ्लॅट, घणसोली येथील रो हाऊस. ५१ ग्रॅम सोने आणि ३५ हजारांची रोकड
कायनात खान : घणसोलीतील रो हाऊस, शिळफाटा येथील घर.
सर्फराज खान : मुंब्रा येथे फ्लॅट आणि एक कार.
प्रियंका करकौर : प्रियंकाच्या घरातून १७ लाखांची रोकड मिळाली.