मुंबईतीत चेंबूर परिसरात एका व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. येथील डायमंड गार्डन परिसरामध्ये रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदरुद्दीन खान हे आपल्या कारमधून घरी येत होते. ही कार डायमंड गार्डनजवळ पोहोचली असतानाच तिथे दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी खान यांच्या कारच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबारात सदरुद्दीन खान यांना दोन गोळ्या लागल्या.
या घटनेनंतर आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सदरुद्दीन खान यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी नाकेबंदी करून तपासाला सुरुवात केली आहे. त्याबरोबरच न्यायवैद्यक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास करत असलेले पोलिस आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरुद्दीन खान हे एक व्यावसायिक असून, ही घटना घडली तेव्हा ते एका खासगी वाहनाने घरी परतत होते. ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत.