मुंबई- राज्यात रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याचे सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केलं आहे. तसेच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मास्कसक्ती आणि आगामी राज्यसभेची निवडणुक या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अपक्ष आमदारांशी देखील संवाद साधणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं मतदान करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर भाजपाचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित १६ मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं असून, अन्य ७ आमदारांचा पाठिंबा धरता एकूण २९ मते आहेत. उर्वरित १३ मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे.
निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न-
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल १८ वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आलं. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे