बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा
By मनोहर कुंभेजकर | Published: March 11, 2023 07:30 PM2023-03-11T19:30:31+5:302023-03-11T19:30:58+5:30
मुंबई -न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत रॉयल हिल सोसायटीच्या गच्चीवर सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्ची वरून त्या गच्चीवर उड्या ...
मुंबई-न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत रॉयल हिल सोसायटीच्या गच्चीवर सलग दोन दिवस मध्यरात्री या गच्ची वरून त्या गच्चीवर उड्या मारणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज दुपारी दोन वाजता पिंजरा लावण्यात आला.
या संदर्भात लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमत मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. काल सकाळी लोकमत ऑनलाईन मध्ये सदर वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध झाल्यावर विधानसभेत लोकमत ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत आणि कात्रण दाखवत येथील सोसायटीत सलग दोन दिवस बिबट्याचा मुक्त संचारामुळे येथील ५०० नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सरकारने त्यांच्या सुरक्षितेसाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्याची आग्रही मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशीचे स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. तसेच त्यांनी या संदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देवून त्यांची भेट घेतली होती.
याबाबत रॉयल हिल सोसायटीचे सचिव अजित जठार यांनी सांगितले की,लोकमतने दिलेली बिबट्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली.आणि लगेच आमदार सुनील प्रभू यांनी सदर प्रश्नी विधानसभेत उठवलेल्या आवाजामुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली.आज दुपारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार वनखात्याने येथील रहेजा प्लॉट,म्हाडा बंगलो ४६ -अ च्या मागील बाजूस बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यावेळी वनखात्याचे वनक्षेत्रपाल विजय बारब्दे,वनपाल रोहन शिंदे,वनरक्षक सुरेंद्र पाटील,वैभव पाटील आणि अन्य बचाव पथकाने चांगले सहकार्य करत आपल्या समोर पिंजरा लावला. लोकमतने सर्वप्रथम दिलेली बातमी आणि आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत आमचा प्रश्न पोटतिडकीने मंडल्याबद्धल आज बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लागला अशी माहिती अजित जठार यांनी दिली.आता बिबट्या पिंजऱ्यात कधी जेरबंद होतो याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.