मुंबई : नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना ऑर्डरच्या दुर्गा देवीच्या मूर्ती ठेवलेल्या स्टॉलमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार सोमवारी रात्री घुसली. यात तयार १५ ते २० देवी मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. य़ा अपघातात पाळीव श्वानही चिरडून ठार झाले. या अपघातप्रकरणी चालक दक्षय संघवी याच्यावर एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
तक्रारदार प्रवीण देसाई (४४) यांचा बोरिवली पश्चिम परिसरात नित्यानंद गार्डनसमोर असलेल्या फुटपाथवर श्री दुर्गा गणेशमूर्ती शाळा नावाने देवीदेवतांच्या पीओपीच्या मूर्ती बनविण्याचा कारखाना आहे. नवरात्र सण जवळ येत असल्याने देसाई यांनी स्टॉलमध्ये देवीच्या मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. या कारखान्यातच ते राहत होते. त्यांनी एक ब्राऊनी नावाची श्वान पाळली होती. तिचाही मृत्यू झाला.
गुन्हा दाखल करत अटक -- देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, १० ऑक्टोबर रोजी रात्री १:२५ च्या सुमारास देसाई स्टॉलच्या बाहेर थांबले होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने आली. - ती थेट फुटपाथवर असलेल्या देसाई यांच्या मूर्ती शाळेच्या शेडमध्ये घुसली. त्यामुळे तयार १५ ते २९ मूर्तींना गाडीची जोरदार धडक लागून जवळपास ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले आहे. - संघवीवर भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३६,४२७ तसेच श्वानाच्या मृत्यूप्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले.
जागेचे भाडे, पगार कुठून देऊ?संघवी हा १२० च्या वेगाने गाडी चालवत होता. मी रंगकाम करून कांजूरमार्गला साडी नेसवायला पाठवायच्या लहान आकारापासून सहा फुटाच्या मूर्तीचे यात नुकसान झाले. मी बऱ्याच लहान-मोठ्या पांढऱ्या रंगाच्या तयार मूर्ती बाहेर ठेवल्या होत्या, त्याचे नुकसान झाल्याने मूर्ती शाळेचे भाडे, लाईट बिल, कामगारांचा पगार तसेच अन्य खर्च मी कसा देऊ हा प्रश्न मला सतावत आहे, असे तक्रारदार मूर्तिकार प्रवीण देसाई यांनी सांगितले.