मुंबई - वीजबिलाची थकबाकी रक्कम भरण्यास सांगितले म्हणून ग्राहकाच्या घरातील महिला तनिशा शिंदे हिने महावितरण भांडूप उपविभाग २ येथील महिला तंत्रज्ञ सुकेशनी सदावर्ते यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल या महिले विरुद्ध भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी सुकेशनी सदावर्ते या नेहमीप्रमाणे वीजबिल वसुलीसाठी कामावर गेले होत्या. लाईट बिल न भरलेल्या ग्राहकांची यादी घेऊन त्या भांडुप पश्चिम येथील एम. जे रोड येथे पंचरत्न सोसायटीमध्ये गेल्या होत्या. तेथील एका इमारतीमध्ये राहणारे केसर शिंदे यांची थकबाकी असल्यामुळे त्यांना वीजबिल भरायला सांगण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता तेथे केसर शिंदे नसून त्यांची सुन तनिशा शिंदे होती. तिला सदावर्ते यांनी त्यांच्या येण्याचे कारण सांगून त्यांचे थकीत असलेले लाईट बिल भरण्यास सांगितले. त्यावेळी तिने दोन दिवसात बिल भरते असे सदावर्ते यांना सांगितले.
१७ ऑक्टोबर रोजी सदावर्ते थकबाकी न भरलेल्या ग्राहकांची यादी घेऊन पुन्हा पंचरत्न सोसायटीत सूचना देण्यासाठी गेले असता बिल्डिंगखाली तनिशा शिंदे उभ्या दिसल्यामुळे तिला बिल भरले की नाही ? असे विचारले व बिल लवकर भरून घेण्यास सांगितले. तिला बिलाबाबत पुन्हा का विचारते ? याचा राग आला म्हणून तिने सदावर्ते यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
गळ्यातील महावितरणचे ओळखपत्र तोडून नुकसान केले. सदावर्ते यांनी स्वतःच्या रक्षणासाठी विरोध केला तेव्हा तनिशा शिंदेने त्यांचे केस दोन्ही हाताने ओढले व त्यांना शिवीगाळ केली. सदावर्ते यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे वरिष्ठ अधिकारी व सहकारी कर्मचारी यांना घटनेबाबत माहिती दिली. यामुळे महावितरण कर्मचाऱ्यामध्ये असंतोष पसरला. सर्वांच्या सहकार्याने सदावर्ते यांनी भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.