कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 01:09 PM2023-08-05T13:09:12+5:302023-08-05T13:13:10+5:30
कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याबाबत चौकशी सुरू होती. त्यात आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी केली जात होती. प्राथमिक चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. जी बॉडी बॅग बाजारभावात २ हजार रुपयांना मिळत होती ती बॉडी बॅग तत्कालीन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साडेसहा हजार रुपयांना खरेदी केले होते. बाजारभावापेक्षा तिप्पट दराने ही खरेदी झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यातून प्राथमिक चौकशीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड घोटाळ्यात सुजित पाटकरांनाही अटक
महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याबाबत २२ जून रोजी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या तपासात ईडीच्या हाती घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची डायरी हाती लागली आहे. केंद्रीय एजेन्सीनं १५ ठिकाणी धाड टाकली होती. ज्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांच्या घराचाही समावेश आहे. या छापेमारीवेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना एका संशयिताच्या घरी डायरी सापडली. ज्यात बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील मध्यस्थाचा उल्लेख आहे. या डायरीत बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आलेल्या रक्कमेचाही समावेश आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राटे देण्यासाठी या मध्यस्थाने महत्त्वाची भूमिका निभावल्याचा संशय आहे. अलीकडेच या प्रकरणी सुजित पाटकर यांना अटकही झाली आहे.