मुंबई: एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये रोख रक्कम काढल्या जाणार्या भागात चिकटपट्टी चिकटवण्याचा प्रकार वर्सोवा पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी बँकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
तक्रारदार अभिषेक सिंग हे कोटक महिंद्रा बँकेच्या क्यूआरटी टीममध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार २४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता कंपनीच्या एका संबंधित ॲपमध्ये त्यांना व्हिडिओ अलर्ट आला. त्यांनी तो उघडून पाहिल्यानंतर सात बंगला परिसरात असलेल्या गायत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील एटीएम सेंटरमध्ये असलेल्या मशीनला दोन्ही इसम पट्टी लावताना दिसून आले. त्यामुळे सिंग यांनी तातडीने त्या ठिकाणी राउंडअपवर असलेल्या गणेश धनराव यांना सदर ठिकाणी पाठवले. गणेश घटनास्थळी पोहोचल्यावर एटीएम मध्ये त्याना कोणीही आढळले नाही. सध्या एटीएम स्कॅममध्ये मशीनच्या ज्या भागातून पैसे येतात त्याठिकाणी प्लास्टिकची पट्टी लावून एटीएम मशीनमधून बाहेर येणारे पैसे अडवले जातात. त्यामुळे ग्राहकांना ते मिळत नाहीत आणि एटीएममध्ये तांत्रिक समस्या असल्याचे वाटून ग्राहक तिथून निघून जातात. त्यानंतर हे स्कॅमर ती पट्टी काढून त्याठिकाणी अडकलेले पैसे काढून घेतात अशी या आरोपींची कार्यपद्धती आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमाच्या विरोधात सिंग यांनी तक्रार दिल्यावर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.