मुंबई : लखनौ पोलिस विभागातून बोलत असल्याचे भासवून ७० वर्षीय आजोबांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली. पुढे, चौकशीपर्यंत खात्यातील पाच लाख ६७ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडून आजोबांची फसवणूक केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड परिसरात राहणारे ७० वर्षीय आजोबा हे एका ऑइल कंपनीतून मुख्य व्यवस्थापक म्हणून २०१३ साली निवृत्त झाले आहेत. त्यांची मुलगी कॅनडामध्ये शिक्षणासाठी आहे. २६ मार्च रोजी त्यांना एका महिलेने कॉल करून दिल्ली येथील टेलिकॉम कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. मनी लाँडरिंगचा व्यवहार झाल्याचे सांगून कॉल लखनौ पोलिस स्टेशनला ट्रान्सफर केल्याचे भासवले.
एका व्यक्तीने पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून, खात्यात फसवणुकीतील रक्कम आल्याचे सांगून खात्यातील व्यवहारांबाबत चौकशी केली. अकाउंट व्हेरिफाय करत असल्याचे सांगून, बँक खात्याची माहिती मिळवली. विश्वास संपादन करत सुरक्षेसाठी खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडली. त्यांनी वेगवेगळ्या व्यवहारात ५ लाख ६७ हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे पुन्हा पाठवणार असल्याचे आश्वासन दिल्याने त्यांनीही विश्वास ठेवून पैसे पाठवले. काही दिवसानी पैसे परत पाठवण्यास सांगताच आरोपीने टाळाटाळ केली. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.