मुंबई : खोटे अनुभव प्रमाणपत्र देत परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या मेकॅनिकल इंजिनियर आणि अमेरिकन कॉन्सलेटची फसवणुक करण्याचा प्रकार वांद्रेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीकेसी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार अल्फिन राफिल (३३) यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यावर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बेंगलोर येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीच्या शोधात असताना एरनाकुलम येथील बमदक नावाची इंटरनॅशनल कंपनी लोकांना परदेशात नोकरीसाठी पाठवते अशी माहिती त्यांना मिळाली होती. राफिल यांनाही परदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याने त्यांनी सदर ऑफिसचे अधिकारी सुनील कृष्ण आणि त्याचा सहकारी विकास यांना संपर्क केला.
त्यावर त्यांना परदेशात जाण्याचा विजा काढून देण्याचे सांगत दुकलीने राफिलकडे ५० हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ रोजी कृष्णा याने रफिल यांच्या नावाचा विजा आपल्या करण्याकरता ऑनलाइन फॉर्म आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र अपलोड केले. तसेच १७ मार्च, २०२३ रोजी बायोमेट्रिक करून येण्यासही सांगितले. त्यानुसार राफिल यांनी बायोमेट्रिक केले आणि ते मुलाखतीकरिता अमेरिकन कॉन्सलेट या ठिकाणी गेल्यावर सादर कागदपत्रांमध्ये कॉनीवल सपोर्ट सर्विस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रमाणपत्र खोटे असल्याचे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यावर याबाबत मला माहिती नसून एजंटनी हे कागदपत्र भरल्याचे राफिल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचवेळ अशाच प्रकारे केरळ मधील वैसाग आय्यपन (२७) नामक इसमाची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार अमेरिकन कॉन्सलेटच्या अधिकाऱ्यांसह राफिल याने पोलीस ठाणे गाठत संबंधितां विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.