गुन्हा दाखल होताच संतापले संजय राऊत; खासदारांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:13 AM2023-05-15T09:13:42+5:302023-05-15T09:15:00+5:30
आता, राऊत यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती देत मी घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई - शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकावर गंभीर आरोप करत हे सरकारच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १६ आमदारच नव्हे संपूर्ण सरकार अपात्र असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही शिंदे, फडणवीस हे बेशरमपणे, निर्लज्जपणे निकाल हा आपल्या बाजूने लागल्याचे सांगत आहेत. हे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याने पोलीस, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेशदेखील पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे नाशिकपोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आता, राऊत यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती देत मी घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. ''नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटनाविरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील, अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असे संजय राऊत यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हटलं आहे.
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राऊत हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. या त्यांच्या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ५०५ (१ब) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षा यंत्रणांना अशाप्रकारचे आवाहन करणे हा गुन्हा आहे. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. राऊत यांना पोलीस समन्स पाठविणार आहेत. दरम्यान, राऊत यांचे वकील कायदेशीर बाबी तपासतील आणि त्याला उत्तरे देतील, असे सांगण्यात आले आहे.