लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:
होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकलवर फुगे मारल्याने प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी लोकलवर या सणादरम्यान फुगे मारण्यात येऊ नयेत, असे रेल्वे प्रशासनातर्फे बजाविण्यात आले आहे. फुगे मारल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि शहर उपनगरात लोकलवर आणि बेस्ट बसवर फुगे मारण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या.
रंगपंचमीला अवघे एक ते दोन दिवस शिल्लक असताना अशा घटना घडण्याची भीती असते. जे रेल्वे मार्ग झोपडपट्ट्यांच्या परिसरातून जातात अशा ठिकाणी या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुखापत देखील झाली आहे. पाण्याने भरलेले फुगे अथवा पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या लोकलच्या दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशांना लागल्याने डोळ्यांना देखील इजा होण्याची भीती असते.
परिणामी अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे आणि या माध्यमातून लोकलवर फुगे मारू नका, असा संदेश देण्यात आला आहे.
- मागील गोष्टींची पुनरावृत्ती नको
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग या मार्गासहीत इतर मार्गांवर देखील फुगे मारण्यात आल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या होत्या. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षी या घटना घडू नयेत यासाठी मागील तीन दिवसांपासून प्रशासनातर्फे हे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी होळीदरम्यान लोकलवर फुगे मारण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. लोकलच्या दरवाजात उभे असणाऱ्या प्रवाशांसह खिडकीलगत बसलेल्या प्रवाशांना या घटनांमुळे हानी पोहोचण्याची शक्यता असते. होळीपूर्वी आणि होळीनंतर अशा घटना घडतात. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून लोकलवर फुगे मारू नयेत.- डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे