दोन महिन्यांत लुटीच्या घटनांचे शतक; दिवसाला तीन ते चार गुन्हे, भररस्त्यात केले हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 11:51 AM2023-03-27T11:51:25+5:302023-03-27T11:55:06+5:30

गेल्या काही दिवसांत चोरी, जबरी चोरीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे.

A century of looting incidents in two months; Three to four crimes a day, assaults in abundance | दोन महिन्यांत लुटीच्या घटनांचे शतक; दिवसाला तीन ते चार गुन्हे, भररस्त्यात केले हल्ले

दोन महिन्यांत लुटीच्या घटनांचे शतक; दिवसाला तीन ते चार गुन्हे, भररस्त्यात केले हल्ले

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांत चोरी, जबरी चोरीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत चोरीच्या ९४६ तर जबरी चोरीच्या १०८ घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. भररस्त्यात हल्ला करत चोरीच्या घटनांबरोबरच थेट रात्रीच्या सुमारास घरात घुसून लुटीच्या घटनांची भर यामध्ये पडताना दिसत आहे.

मुंबईत गेल्या वर्षभरात ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकूण १२२ कोटी, ३१ लाख, २४ हजार ४४७ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली. यापैकी ५३ कोटी १६ लाख ७४ हजार ५९३ कोटींची मालमत्ता हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. याच तुलनेत २०१९ मध्ये ३४ टक्के, २०२० मध्ये ३३ टक्के तर २०२१ मध्ये याचे प्रमाण वाढून ४३ टक्क्यांवर गेले आहे. यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये घरफोडीत्या २२५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक १८७ घरफोड्यांच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी याच दोन महिन्यांत घरफोडीच्या २४२, तर चोरीच्या ६४२ घटनांची नोंद झाली होती. 

मोबाइलसाठी लोखंडाने हल्ला
माहीम धारावी स्कायवॉकवर जात असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने डोक्यात लोखंडी बांबूने हल्ला चढवित मोबाइल हिसकावून पळ काढला. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सहाया नाडर (२१) या जखमी असून सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री शुद्धीवर आल्यानंतर नाडर यांच्या तक्रारीवरून शाहूनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. 

रिक्षातून पर्स चोरीला
सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने घरी जाण्यासाठी पवईहून रिक्षाने घराच्या दिशेने निघाल्या. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मिलन सबवेच्या ब्रिजवर चढत असतानाच दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार करूनही चोरटयांनी त्यांना धक्का देत त्यांची पर्स हिसकावून पळ काढला. पर्समधील जवळपास १७ हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यांनी विलेपार्ले पोलिस गाठून तक्रार दिली. वृद्धेच्या घरात 

घुसून चोरी
घाटकोपर पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धेचा घरात घुसून चोरट्यांनी सव्वालाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या खिडकीचे गज वाकवून त्यातून प्रवेश करून चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून चोरी केली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पाठलाग करत चोरी
दहिसर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करत दोन चोरटे तिच्या इमारतीपर्यंत पोहोचले. तरुणी वाहन पार्क करून येत असताना दुचाकीवरील एक तरुण तिच्याकडे आला. तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दोघेही पसार झाले. तरुणीने आरडाओरड करेपर्यंत चोर पसार झाले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा बुधवारी नोंदविला आहे. 

Web Title: A century of looting incidents in two months; Three to four crimes a day, assaults in abundance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस