Join us  

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:57 PM

चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता.

मुंबई- खरी शिवसेना कोणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी त्याचा एक फैसला बुधवारी सायंकाळी मुंबईत आयोजित दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने ‘जनता की अदालत’मध्ये होणार आहे. मुंबईतील शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात सकाळपासून राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली आहे.

शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले मेळावे तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे. 

शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. तसेच या खुर्चीच्या बाजूला बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता.

 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

शिवतीर्थावरील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर देखील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. याआधी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची व्यासपीठावर ठेवली होती. तसेच संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कौतुक केले होते.

दरम्यान, पदभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांच्या मतदारसंघातील बहुतेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्रांनी केला. शिंदे गट आणि भाजप सरकारला ७ ऑक्टोबरला १०० दिवस पूर्ण होत असल्याने मेळाव्याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

आधी कोण बोलणार?

दोन्ही मेळाव्यांची वेळ साधारणत: सारखीच आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे बोलणार की एकनाथ शिंदे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ठाकरे यांचे साधारणत: ८ ला सुरू होते. त्यांचे भाषण झाल्यावर त्याला शिंदे यांनी तडाखेबंद उत्तर द्यावे, असा शिंदे गटाचा प्रयत्न असेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशिवसेना