मुंबई : सरत्या २०२३ वर्षात खगोलप्रेमींनी विविध खगोलीय घटना पाहता आल्या. यामध्ये आता डिसेंबर महिन्यातील खगोलयीय ‘तेजस्वी’ घटना आणखी भर घालणार आहेत. विशेषत: बहुतांशी खगोलीय घटना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत.
डिसेंबर महिन्यात २ महत्त्वाचे उल्कावर्षाव, १ धूमकेतू आणि अनेक ग्रह-चंद्राची युती पाहण्याची संधी आहे. या सर्व खगोलीय घटना नागरिक, अभ्यासक आणि निरीक्षकांनी पाहाव्यात, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
१४ डिसेंबरला उल्कावर्षाव
डिसेंबर महिन्यात एकूण ६ उल्का वर्षाव होत असले तरी जेमिनिड उल्कावर्षाव हा सर्वाधिक मोठा उल्कावर्षाव मानला जातो. हा उल्कावर्षाव ४ ते १७ डिसेंबरपर्यंत दिसतो; परंतु सर्वाधिक ताशी १००-१३० उल्का या १४ डिसेंबरला दिसण्याची शक्यता असते.
जेमिनी तारासमूहात हा उल्कावर्षाव कमी- अधिक दरवर्षी दिसतो. पूर्वेला रात्री ८ वाजेपासून तर पहाटेपर्यंत जरी दिसत असला तरी उल्कावर्षावाचे सर्वाधिक प्रमाण रात्री १ ते २ वाजेपर्यंत दिसेल.
२० उल्का दिसण्याची शक्यता
१७-२३ डिसेंबरपर्यंत हा उल्कावर्षाव दिसत असला तरी सर्वाधिक उल्का २३ डिसेंबरला दिसेल. उर्सा मायनर तारा समूहात हा उल्कावर्षाव रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पूर्व-उत्तर दिशेला दिसेल; परंतु जास्तीत जास्त ताशी २० उल्का दिसण्याची शक्यता आहे.
हा उल्कावर्षाव ८ पी / टेटेल धूमकेतूमुळे दिसतो. अवकाशातील दगड जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा घर्षणाने ते तापतात आणि एका रेषेत चकाकताना दिसतात. त्यांना आपण तारा तुटणे, असे संबोधित करतो. यातील बहुतेक दगड राख होऊन जमिनीवर पडतात किंवा कधी उल्कारूपाने जमिनीवर शिल्लक आढळतात.