मुंबई :
दर दोन वर्षांनी राज ठाकरे यांचे हृदयपरिवर्तन होत असते. सतत भूमिका बदलणे योग्य नाही. शेतकऱ्याचा मुलगा ट्रॅक्टरवर जीन-पँटमध्ये दिसला पाहिजे म्हणणारे राज आता भोंग्यांपर्यंत पोहोचले आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०१४ साली राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले. नंतर त्यांचा विरोध केला. आता परत त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे त्यांच्यावर फार बोलणे योग्य होणार नाही. मात्र, राज्यात भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर न लावता रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जात असे. त्यात सर्वच राजकीय पक्ष आणि लोक सामील होत असत. पण, आता त्याला राजकीय रंग दिला जात आहे. हे सर्व पक्षाच्या बॅनरशिवाय साजरे झाले पाहिजेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, पवार यांना जातीयवादी म्हणणे योग्य नाही. त्यांचे राजकीय, सामाजिक जीवन आपल्या समोर आहे.
कोळसा वाहतुकीस रेल्वे मिळत नाही राज्यात उष्णतेमुळे विजेचा वापर वाढला आहे. तसेच लॉकडाउननंतर सर्व उद्योग सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी वीज खरेदीची योजना राज्य सरकारने आणली. कोळशाची खरेदी केली जात आहे. मात्र, या कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मिळत नसल्याचा आरोपही थोरात यांनी केला.