मुंबई : चेंबूर येथील मेट्रोचा कामाच्या ठिकाणी उघड्या तारेला स्पर्श झाल्याने एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल नोंदवत, तपास सुरू केला आहे. प्रज्वल नखाते (१४) असे त्याचे नाव असून तो चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील रहिवासी होता.
त्याच्या घराच्या काही अंतरावरच मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी मेट्रोकडून पत्रे लावण्यात आले असून या पत्र्यांवर लाइट लावण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी प्रज्वल या परिसरातून जात असताना, त्याचा हात पत्र्याला लागला. याच वेळी अचानक त्याला विजेचा धक्का बसला. नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. नेहरूनगर पोलिसांनी मेट्रो कंत्राटदार विरोधात गुन्हा नोंदवत, तपास सुरू केला आहे. मात्र, मेट्रोचा निष्काळजीपणामुळे प्रज्वलचा जीव गेला. मेट्रोने त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली आहे.