Aditya Thackeray ( Marathi News ) : "आपल्या मनात २०१४ पर्यंत ठासून भरलं होतं की, स्ट्राँग लीडर इज अ स्ट्राँग कंट्री. पण हा चुकीचा विश्वास आपण मनात ठेवत आलो आहोत. मजबूत देश पाहिजे असेल, तर 'मजबूर' सरकार गरजेचं आहे. मजबूर म्हणजे एकदमच प्रॉब्लेमॅटिक नाही, पण मिलीजुली सरकार गरजेचं आहे," असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
"आपल्याकडे राज्य, जिल्हे, तालुके, त्यांची संस्कृती, कला, परंपरा, पद्धती, भाषा हे सगळं भारत म्हणून एकत्र आणलंय. पण आज कुठेतरी जीएसटी, इडी, आयटी, सीबीआय, इतर काही बंधनं यातून ओव्हर सेंट्रलायझेशन झालं असून तुमचा आवाज दिल्लीत ऐकला जातोय की नाही, याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे देशात मिलीजुली सरकार हवं, जे प्रत्येक राज्यातून प्रतिनिधीत्व आणि सगळ्यांची मन की बात ऐकतं. विकास सगळ्यांचा झाला पाहिजे. सगळ्यांचं ऐकून विकास झाला पाहिजे. चीन किंवा रशिया हे मॉडेल घेऊन आपण गेलो, तर काही ठराविक लोकांचा - नेत्यांचा विकास होतो," अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सध्याचं सरकार पायउतार करणं का गरजेचं आहे, याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिक परिसरातील लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी 'लोकमत'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि डिजिटल टीमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, तसेच ज्या भाजपने माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'नकली संतान' असा शब्द वापरला त्या भाजपसोबतही आम्ही पुन्हा युती करणं शक्य नाही, असं आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं आहे.
"आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन चालणारं"
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या भाषणाला सुरुवात करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 'जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो' हा शब्दप्रयोग टाळून 'जमलेल्या देशभक्तांनो' असं संबोधताना दिसत आहे. यावरून होणाऱ्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीत प्रत्युत्तर दिलं आहे. "हिंदू हा शब्द आम्ही वापरत आलोय... आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत. हिंदुत्ववादी पक्ष आहोतच. पण मुस्लीम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, इतर धर्माचे जे मतदार असतील ते आमच्याकडे येणं काही गैर आहे का? आम्ही जी मतं मागत आहोत, ती देशाच्या हितासाठी मागत आहोत. संविधान आणि लोकशाहीसाठी मागत आहोत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मागत आहोत. आज फटका सगळ्यांना बसलाय. ८० कोटी लोक आजही रेशनवर आहेत. त्यात कोणत्या धर्माचे किती लोक हे कोण बघायला जातंय? देशहिताचं काम सगळ्यांनाच सोबत घेऊन करायचंय. देशभक्त बोलणं किंवा देशाबद्दल बोलणं चुकीचं आहे का? आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र देणारा भाजपा कोण? आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन चालणारं आहे. बेरोजगार आहेत, त्यांची जात काय, धर्म काय? आमचं हिंदुत्व आणि भाजपाचं हिंदुत्व यातलं अंतर खूप वाढत चाललेलं आहे. आमचं चूल पेटवणारं हिंदुत्व आणि त्यांचं घर पेटवणारं," अशा शब्दांत आदित्य यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
"उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दया, माया, क्षमा नाहीच"
"लोकसभा निवडणुकीत महायुतीत ज्या प्रकारे जागावाटप झालं, त्यानंतर तुम्हाला सोडून जे ४० आमदार गेले आहेत, त्यातील काही आमदारांना आपल्या तिकिटाबाबतही शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यातील काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीत गुपचूप मदत करतो, तुम्ही विधानसभेला आम्हाला तिकीट द्या, असं त्या आमदारांचं तुमच्याशी बोलणं झाल्याची चर्चा आहे. या चर्चेत कितपत तथ्य आहे आणि तथ्य असेल तर अशा आमदारांना तुम्ही परत पक्षात घेणार आहात का?" असा प्रश्न मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर गद्दांरासाठी आमचे दरवाजे बंद असल्याचं सांगत आदित्य यांनी म्हटलं की, "शिवसेनेचे दोन गट नाहीत तर एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे आणि दुसरीकडे गद्दारांची गँग किंवा टोळी म्हणता येईल. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, चर्चेपेक्षा तुम्हालाही बऱ्याच गोष्टी माहीत असतात आणि खूप वेळा तुमचे सूत्र बरोबरच असतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याआधी पण लोकांनी पक्ष बदलले आहेत, काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे पक्ष बदलतात, काही जण विचारसरणीत बदल झाल्यामुळे पक्ष बदलतात, तर काही जण राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे पक्षबदल करत असतात. हे सगळे लोक जाऊन-येऊन असतात ते जाताना एक सभ्यता पाळतात आणि ती म्हणजे हे लोक पक्षाने जे पद दिलंय ते त्या पदाचा राजीनामा देतात, लोकांनी ज्या पदावर निवडून दिलंय त्या पदाचा राजीनामा देतात. मात्र हे जे ४० गद्दार गेले आहेत ते डरपोकपणे पळाले आहेत, आधी सुरतला पळाले, गुवाहाटीला पळाले, गोव्यात तर टेबलवर चढून विचित्र हातवारे करून नाचले, अशा लोकांना दया, माया, क्षमा नाही. त्या लोकांना परत घेणं नाही. कारण त्या लोकांनी फक्त शिवसेनेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला नाही तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आहे, उद्धवसाहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे," असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.