लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ’रेबिजमुक्त मुंबई’साठी मुंबई महानगरपालिका तसेच योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. तर या लसीकरणानंतर श्वानांच्या गळ्यात ‘क्यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घातले गेले आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून श्वानांची तसेच त्याला खाद्य देणाऱ्यांचा तपशील, संलग्न वैद्यकीय माहिती प्राप्त होऊ शकेल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱ्या ‘रेबिज’च्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित केला आहे. त्या धर्तीवर पालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ उद्दिष्ट निश्चित केले आहे.
विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांचा पुढाकार
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा राबता असतो. अशा प्रकारच्या परिसरात अनोळखी व्यक्ती दिसल्यावर श्वानांची आक्रमकता वाढते. प्रसंगी उपद्रव वाढतो.
- हे विचारात घेऊन भटक्या श्वानांच्या रेबिज लसीकरणाचा पथदर्शी प्रकल्प विमानतळाबाहेर राबविण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. मंगळवारी, योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने २६ श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. २५ जुलै रोजी मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेसशी करार झाला.
भटक्या श्वानांसाठी टॅग
यानंतरही ही मोहीम सुरू राहणार आहे. या उपक्रमासाठी या दोन्ही स्वयंसेवी संस्था नि:शुल्क सेवा देत आहेत. भटक्या श्वानांसाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन टॅग’ तयार करण्यात आले असून त्याद्वारे मुंबईतील भटक्या श्वानांची सांख्यिकी माहिती (डेटाबेस) मिळण्यास मदत मिळणार आहे.
श्वान गणना
दर दहा वर्षांनी श्वान गणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिमेंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस दिली जाईल.
भटक्या श्वानांची संख्या वाढली
- केवळ निर्बीजीकरण, लसीकरण यावरच न थांबता श्वानांच्या आरोग्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता अत्याधुनिक उपाययोजना राबविणार आहे.
- २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईत सुमारे ९५ हजार भटके श्वान होते.
- ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे.
- भटक्या श्वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये, तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते.
- महापालिकेकडून भटक्या श्वानांना आधीपासून लस दिली जात आहे.