दोन हजारांच्या नोटेला चारशेचे कमिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:17 PM2023-11-25T12:17:46+5:302023-11-25T12:18:13+5:30

रिझर्व्ह बँकेसमोरील गर्दीमुळे दलालांची २५ टक्के चांदी

A commission of four hundred on a note of two thousand in mumbai | दोन हजारांच्या नोटेला चारशेचे कमिशन

दोन हजारांच्या नोटेला चारशेचे कमिशन

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुदतीत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू न शकलेल्या नागरिकांना आता नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे धाव घ्यावी लागत असून, त्यामुळे बँकेसमोर रोज मोठी रांग लागत आहे. या गर्दीचा फायदा घेत काहींनी वीस ते पंचवीस टक्के कमिशनची मागणी करत त्रयस्थ लोकांना रांगेत उभे करून कमिशनचा व्यवसाय सुरू केल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतर आता ही सुविधा रिझर्व्ह बँकेच्या १९ केंद्रांवरच उपलब्ध आहे. परिणामी, रिझर्व्ह बँक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः दिवाळीची सुटी संपल्यानंतर नोटा बदलणाऱ्यांची रांग वाढत आहे. 

एका व्यक्तीला १० नोटा बदलण्याची संधी

 सध्या एका व्यक्तीला १० नोटा बदलून दिल्या जात आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा १५ दिवसांनीच त्या व्यक्तीला नोटा बदलून घेण्याची संधी जाते. तसेच येथील गर्दी पाहता, भरउन्हात उभे राहून दीर्घ प्रतीक्षेनंतर नोटा बदलून घेणे सर्वांनाच शक्य होत नाही.  
 बँकेत रांग लावणे शक्य होत नसल्याने या गैरसोयीचा फायदा घेत काहींनी नागरिकांना नोटा बदलून देण्यासाठी त्यांचे लोक उभे करण्याचा व्यवसायच जणू सुरू केला आहे, अशी चर्चा लोकांमध्ये असते. अशा पद्धतीने नोटा बदलून देण्यासाठी २ हजारांमागे ५०० ते ४०० रुपये एवढे कमिशन नोट बदलून घेण्यासाठी दलाल मागत आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून सूचना
नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खास येथे बसण्याची व्यवस्था केली आहे. बँक परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. काही अडचणी असल्यास नागरिकांनी बँकेत संपर्क साधावा. मात्र, बँकेबाहेरील कोणत्याही व्यक्तीसोबत नोटा बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नये, अशा सूचना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्यात आहेत.

नागरिकच स्वखुशीने पैसे देतात...
एवढ्या मोठ्या रांगेत उभे राहणे काही नागरिकांना शक्य होत नाही. शिवाय भरउन्हात बसणेही जमत नाही. त्यामुळे आम्ही रांगेत उभे राहून नागरिकांना मदत करीत असतो. आमची मेहनत म्हणून नागरिकच स्वखुशीने आम्हाला दोन-चारशे रुपये देतात, असे एका महिला एजंटचे म्हणणे आहे.

Web Title: A commission of four hundred on a note of two thousand in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.