सातवाहन, पांडवकालीन बारवांचे तज्ज्ञांची समिती करणार संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:41 AM2023-05-22T09:41:42+5:302023-05-22T09:41:55+5:30
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सातवाहन, पांडवकालीन बारवा म्हणजे पायऱ्यांच्या विहिरी हा महाराष्ट्राचा पुरातन ठेवा आहे. बाराही महिने पाणीसाठा असणाऱ्या या बारवांचे राज्य सरकारच्या माध्यमातून संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २२ तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पहिल्या टप्प्यात राज्यात बारव जतन व संवर्धनाचे ७५ आराखडे तयार करण्यात येणार आहेत.
राज्यात यादव, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर अशा वेगवेगळ्या राजवटींमध्ये बारव बांधल्या जात. मराठा राजवटीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक बारव बांधल्या. अहिल्याबाई होळकर यांनी उत्तर महाराष्ट्रात बारव बांधल्याची नोंद आहे. कोकणात चिऱ्याच्या दगडात बांधण्यात आलेल्या बारव या ‘घोडबाव’ म्हणून ओळखल्या जातात. काही बारव वर्तुळाकार, आयताकृती, चौकोनी, वर्तुळाकार, आयाताकृती, षटकोनी, अष्टकोनी आहेत. पण हल्लीच्या काळात बारव दुर्लक्षित झाल्या आहेत. प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या बारवांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या, कचरा बारवमध्ये फेकण्यात येतो. पण, अनेक गावातील तरुणांनी बारव स्वच्छतेची संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. त्याला सरकारच्या निर्णयाने बळ मिळणार आहे.