राजकीय साठमारीत दरडी; डाेंगर उतारावरील कुटुंबे पाेरकी; रहिवासी मृत्यूच्या छायेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 10:56 AM2023-08-07T10:56:52+5:302023-08-07T10:57:16+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : ‘माझं अख्खं आयुष्य याच घरात गेले. पूर्वी या भागात कुठल्याच सोयी-सुविधा नव्हत्या. आता झोपड्यांची ...

A crack in the political hoard; Families paddle down the slopes of Dangar; Residents in the shadow of death | राजकीय साठमारीत दरडी; डाेंगर उतारावरील कुटुंबे पाेरकी; रहिवासी मृत्यूच्या छायेत 

राजकीय साठमारीत दरडी; डाेंगर उतारावरील कुटुंबे पाेरकी; रहिवासी मृत्यूच्या छायेत 

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ‘माझं अख्खं आयुष्य याच घरात गेले. पूर्वी या भागात कुठल्याच सोयी-सुविधा नव्हत्या. आता झोपड्यांची जागा पक्क्या घरांनी घेतली. मात्र, पावसाळा आला की तीन महिने जीव मुठीत धरून जगतो. सतत कोसळणाऱ्या पावसात दरवाजा उघडण्याचीही भीती वाटते. मात्र, मुंबईत हक्काचे घर नाही.  त्यामुळे येथून जाणार तरी कुठे, असा सवाल हतबल होऊन मुलुंडच्या शंकर टेकडीवर राहणाऱ्या एका  ६० वर्षीय आजोबांनी उपस्थित केला.    
आजोबा सांगतात, वन विभागाची जागा म्हणून आमचा पुनर्विकास रखडला. त्यात, काही बोलायचे म्हटले की घरे रिकामी करण्याची भीती. आम्हीही माणसेच आहोत. आज संपूर्ण आयुष्य या घरात गेले. मतदानाच्या वेळी आम्ही दिसतो. मात्र, आमची जबाबदारी घेण्याच्या वेळेस दुर्लक्ष होते. अशावेळी स्वत:चे दु:ख उघडपणे सांगण्याची भीती वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सपनों का शहर... मायानगरी अशा वेगवेगळ्या नावांनी मुंबईला ओळखले जाते. मोठमोठे टॉवर, इमारतींचे इमले उभे राहत असताना मुंबईतील जगण्याचे वास्तव मांडणारी परिस्थिती डोंगराळ भागातील झोपड्यांमध्ये दिसून येते. अनेक ठिकाणी डोंगराच्या टोकाशी घरांची लगबग पोहाेचली. मुंबईसारख्या स्वप्न नगरीत हक्काचे घर घेणे शक्य नसल्यामुळे याच ठिकाणी मृत्यूच्या छायेखाली कुटुंब राहत आहेत. कुटुंबातील अनेक पिढ्या याच दहशतीत मोठ्या होत आहेत.   

मुलुंडच्या  शंकर टेकडी भागात राहणारे जयेश शिंदे सांगतात, ‘माझी तिसरी पिढी येथे राहत आहे. या भागात पथदिवे आले. मात्र, प्रकाश काही दिवसांपुरताच मर्यादित राहिला. जवळपास साडे पाचशे कुटुंब येथे राहतात. मात्र, या सर्वांना एकच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तेही कधीही कोसळेल अशा अवस्थेत. त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत आहे. 
दोन ते अडीच वर्षांपूर्वी या भागात डक लाइनची भिंत कोसळून अपघात झाला. त्यात  एकाचा मृत्यूही झाला. त्यानंतर येथे भिंत उभारली. आणखी एका संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. जेणेकरून पुढील काही वर्षात या भागात दरड कोसळण्याची भीती कमी होण्यास मदत होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मुंबईतील उचभ्रू निवासी संकुलातील घरे १००-१०० कोटींना विकली जात असल्याचे वास्तव असताना दुसऱ्या बाजूला टेकड्यांच्या उतारावर दरड कोसळण्याची भीती असतानाही जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या असंख्य कष्टकरी जनतेच्या जीविताचे भयचक्र संपायला तयार नसल्याचे विदारक चित्र अद्याप तसेच आहे. बाबूलनाथच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीपासून ते कुर्ला (जरीमरी), घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि चेंबूरच्या लाल डोंगरपासून ते कांदिवलीच्या दामूनगरपर्यंतच्या टेकड्यांच्या उतारावरील रहिवाशांचे पुनर्वसनाचे प्रश्न कायम आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकांत कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही संरक्षक भिंतीची कामे आजही मार्गी लागलेली नाहीत. नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची भीती असतानाही सरकारी आणि राजकीय आघाडीवर श्रेयवादाच्या लढाईत रहिवासी व्यथा-वेदनेसोबत संतापही व्यक्त करत आहेत.


...तर मृत्यू रोखता आले असते ! 
२०१० मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती. त्यावर वेळीच कार्यवाही झाली नाही. अन्यथा अनेक दरड दुर्घटनेत झालेले मृत्यू रोखता आले असतेे. मंडळाच्या अहवालानुसार १ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्याला एवढी वर्षे उलटूनही नगरविकास विभागाने अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही ‘ॲक्शन टेकिंग प्लॅन’ (एटीपी) तयार केलेला नाही.

मोठी घटना...
२००० मध्ये असलफा आझादनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७६ जणांचा बळी गेला. आजही भीती कायम आहे.
२०२१ - चेंबूर येथे मुसळधार पावसामुळे झाड भिंतीवर कोसळून झालेल्या अपघातात १९ जणांचा तर विक्रोळी येथे संततधार पावसामुळे पंचशीलनगर, सूर्यानगर या डोंगराळ भागात दरड कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: A crack in the political hoard; Families paddle down the slopes of Dangar; Residents in the shadow of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.