Join us  

कॉर्पोरेटमध्येही टेन्शनचेच कल्चर; ५६ टक्के महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आजार झाल्याचे सर्वेक्षणातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:35 AM

कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे म्हणजे चांगला पगार असणार, एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून काम, अशी काहीशी भाबडी कल्पना आपल्या सगळ्यांचीच असते.

मुंबई : कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे म्हणजे चांगला पगार असणार, एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून काम, अशी काहीशी भाबडी कल्पना आपल्या सगळ्यांचीच असते. मात्र या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांवर कामाचा इतका ताण असतो की, त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्यच धोक्यात आले आहे. या कार्यालयीन कामकाजात मोठी स्पर्धा असून ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी येथील कर्मचारी हे जिवाचे रान करतात. त्या कामाच्या ताणाचा परिणाम त्याच्या कौटुंबिक आयुष्यावर होतो. गेले पाच महिने मुंबईसह देशातील विविध शहरांतील ३००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल  ४८ टक्के कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्याचा धोका असल्याचे लक्षात आले असून, त्यांपैकी ५६ टक्के महिलांना मानसिक आजाराचा अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यांचा उपक्रम असलेल्या एम पॉवर या संस्थेने केला आहे. मानसिक आरोग्यविषयात काम करीत असून ३००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

कॉर्पोरेटमधील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण आहे, हे  माहीत होते. मात्र शास्त्रीय पद्धतीने त्यांची मांडणी व्हावी याकरिता हे सर्वेक्षण केले. त्यात ३००० व्यक्तींना १२ प्रश्न विचारले गेले. त्या सगळ्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांचे गुणांकन करून या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यासाठी आयपीएसओएस या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात आले होते.

आपला कर्मचारी काम करत नाही, एवढेच कळते. मात्र, तो का काम करत नाही. त्याच्या आयुष्यात काही समस्या आहेत का, हे कुणीही जाणून घेत नाही. कॉर्पोरेट कंपन्यांनी धोरणात्मक बदल केले पाहिजेत. जेथे आपल्या कर्मचाऱ्याला मनमोकळेपणाने भेडसावत असलेल्या समस्यांबद्दल बोलता येईल. अनेक कर्मचाऱ्यांना माहिती नसते की त्यांना एन्झाइटी, डिप्रेशन आहे. मिड लेव्हलच्या कर्मचाऱ्याचे मानसिक आरोग्य बिघडण्याचा सर्वांत जास्त धोका असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. तणावग्रस्त वातावरण, कामाच्या वेळा आणि कंपनीतील व्यवस्थापनाकडून न मिळणारे सहकार्य या गोष्टींमुळे आरोग्यावरील ताण वाढतो.

- डॉ सपना नायक-बांगर, मानसोपचार तज्ज्ञ, एम पॉवर, मुंबई सेंटर.