मुंबई : मुसळधार पावसाचे मुंबईत अजून आगमन झाले नसताना कुर्ला पूर्वेकडील शिवसृष्टी रोडवरील नाईकनगर सोसायटीमधील चारमजली धोकादायक इमारत सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत १४ जण जखमी झाले असून, त्यापैकी १० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. १९७३ मध्ये ही इमारत बांधकाम करण्यात आली होती. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अनुक्रमे ४ व एका जखमीवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती महापालिकेने व्यक्त केली. मुंबई महापालिकेने या दुर्घटनाग्रस्त इमारतीला २०१३ साली नोटीस बजावली होती. येथील इमारत वास्तव्यास योग्य नसल्याने रहिवाशांनी इमारत रिकामी करावी, असेही महापालिकेने रहिवाशांना बजावले होते. मात्र काही रहिवासी वास्तव्य करत होते. यातील बहुतांश रहिवाशांनी आपली घरे भाड्याने दिल्याने येथे वास्तव्य करणाऱ्यांमध्ये कामगारांच्या कुटुंबांचा समावेश होता.
इमारत का पडली?- २८ जून २०१३ रोजी महापालिकेने इमारतीला दुरुस्तीबाबत नोटीस बजावली होती.- इमारतीमध्ये स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्यात आले नव्हते.- दुरुस्तीची अपेक्षित कामे न झाल्याने इमारतीचा समावेश सी १ प्रवर्गात केला होता. यानंतर नोटीस जारी केली. १८ नोव्हेंबर २०१४ आणि २६ मे २०१५ रोजी इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली. १६ मे २०१६ रोजी इमारतीचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्यात आले.
मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदतकुर्ला पूर्वेला इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाचे काम आणि अन्य सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या.
मृतांची नावे / दोघांची ओळख पटलेली नाही -- अजय भोले पासपोर (२८)- अजिंक्य गायकवाड (३४)- कुशर प्रजापती (२०)- सिकंदर राजभर (२१)- अरविंद राजेंद्र भारती (१९)- अनुप राजभर (१८)- अनिल यादव (२१)- श्याम प्रजापती (१८)- लिलाबाई प्रल्हाद गायकवाड (६०)- रमेश नागसी बडीया (५०)- प्रल्हाद गायकवाड (६५)- गुडडू पासपोर (२२)- राहुल कुमार माझी (२१)- ब्रिजू कुमार माझी (२२)- पप्पू कुमार माझी (३५)- महेश राम (४०)- विनोद जाऊ माझी (३५)- अनोळखी (३५)- अनोळखी (३०)