Join us

कानठळ्या बसविणारा आवाज आला, दरवाजा तोडून रहिवाशांना काढले; दरवाजा उघडताच धुरात मृत्यू दिसला

By गौरी टेंबकर | Published: October 07, 2023 7:57 AM

आम्ही झोपेत असताना साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसविणारा आवाज आला.

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : आम्ही झोपेत असताना साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसविणारा आवाज आला. या आवाजाने धडकी भरली. थरकापत दरवाजा उघडला, तेव्हा काळाकुट्ट धूर मृत्यूच्या रूपात समोर दिसत होता. जिवाच्या आकांताने आग, आग ओरडणाऱ्यांचा आवाज आला आणि आम्ही टेरेसचा टाळा तोडून वर पळाल्याने वाचलो.

ही आपबिती गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत होरपळून निघालेल्या गोरेगावच्या एम. जी. रोडवरील जय भवानी एसआरए इमारतीत राहणाऱ्या डॅनियल यांनी सांगितली. आगीने घेरलेल्या या ७ मजली इमारतीमध्ये जवळपास ६३ फ्लॅट असून, यात जे कपड्यांच्या बदल्यात भांडी देऊन उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब राहतात.

गोरेगाव पोलिस ‘नॉट रिचेबल’!

 भीषण आगीमुळे उठणारे धुराचे लोट पाहताच काहींनी याची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यासाठी लँडलाईन क्रमांक डायल केला जो लागत नव्हता.

 तेव्हा दिंडोशी पोलिसांना त्यांनी फोन केला आणि काही वेळाने एक गाडी घटनास्थळी आली. त्याच्या मागोमाग अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचे स्थानिक म्हणाले.

 कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मालाड, बांगुरनगर तसेच गोरेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

१५ वर्षे तहानलेलो, आग कशी विझवू?

गेली १५ वर्षे इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे आम्ही जवळच्या काली माता मंदिर परिसरातून हांडे, मडकी भरून आणतो आणि दिवसभराची तहान भागवतो. असे असताना कायम पाणीबाणी असल्याने आग विझवण्यासाठी पाणी तरी कुठून आणायचे? मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच शेजारच्या उन्नतनगर चाळीतील रहिवासी आग विझवण्यासाठी धावले तर सनराइज टॉवरमधील काही लोकांनी प्रसंगावधान राखत खिडकीतून पाणी ओतायला सुरुवात केली.

- आशा मनसुख, इमारत रहिवासी

टॅग्स :आग