देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र समान नागरी कायद्याबाबत शिख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हावं, अशी मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं. शिख समाजाचं वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.
कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावा. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच संपूर्ण माहिती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस समान नागरी कायद्याबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.
राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरुन आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. राज्यात गेल्या सहा महिन्यात २४५८ मुली बेपत्ता आहेत, असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले होत आहेत. तसेच या घटनेत दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय ही चिंतेची बाब असल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.