Join us  

मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 9:44 AM

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

वेरूळ येथील शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबत यावेळी शिष्टमंडळाने मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, शिष्टमंडळात किशोर चव्हाण, रवींद्र बनसोड, बाळराजे आवारे पाटील, प्रवीण नागरे, शशिकांत शिरसाट आदींचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटील