19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:36 AM2024-11-01T06:36:54+5:302024-11-01T06:37:03+5:30
अवयव वाहतुकीसाठी वाहतूक शाखेने केला ग्रीन कॉरिडॉर
मुंबई : पुणे येथील एक अवयवदात्याचे बुधवारी दोन अवयवदान करण्यात आले. ते अवयव मुंबईतील रुग्णाला मिळाले असल्याने ते एअर ॲम्ब्युलन्सने मुंबई एअरपोर्टवर आले; मात्र संध्याकाळच्या कोंडीच्या वेळी कालिना ते गिरगाव येथील रुग्णालयात अवयव ॲम्ब्युलन्सने तातडीने नेणे अत्यंत कठीण होते; मात्र मुंबई पोलिस दलाच्या वाहतूक शाखेच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे २२ किलोमीटरचे हे अंतर १९ मिनिटांत ॲम्ब्युलन्सने पूर्ण केले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
रूग्णाला मिळाले हृदय आणि लिव्हर
अवयवदान प्रक्रियेत अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर ते तीन तासांच्या आत प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णावर ती अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत वेळेला खूप महत्त्व असते.
पुणे येथील एका अवयवदात्याकडून हृदय आणि लिव्हर हे अवयव दान करण्यात आले. ते प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या एका रुग्णाला मिळाले. ते अवयव पुण्याहून मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात आणण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली. अवयव वेळेत पोहोचल्यामुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत झाली.
काय असतो ग्रीन कॉरिडॉर?
यावेळी वाहतूक पोलिसांच्या मदतीने अवयवाची वाहतूक करत असलेल्या ॲम्ब्युलन्सला वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
त्यावेळी पूर्ण वाहतूक थांबवून पोलिस गाडीच्या साहाय्याने त्या गाडीस योग्य तो मार्ग तयार करून दिला जातो.
कुठल्याही सिग्नल त्या ॲम्ब्युलन्ससाठी नसतो. गाडी थेट रुग्णालयात पोहोचते. यामुळे वाहतूककोंडीपासूनचा बराच वेळ वाचण्यात मदत होते.
मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या एकाच रुग्णाला हृदय आणि लिव्हर हे दोन्ही अवयव मिळण्याचे हे दुर्मीळ उदाहरण आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मदतीने हे अवयव वेळेवर रुग्णालयात आणणे शक्य झाले. पोलिसांचे याकरिता आभार मानले पाहिजेत. कारण ऐन वाहतूककोंडीच्या काळात अशा पद्धतीने अवयव रस्तेमार्गे आणणे जिकिरीचे काम असते.
- डॉ. भरत शहा, सरचिटणीस, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती