कितीही प्रेम केले तरी कुत्रा म्हणजे माणूस नव्हे - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:04 PM2023-01-06T13:04:01+5:302023-01-06T13:04:27+5:30
११ एप्रिल २०२० रोजी मानस गोडबोले हा फूड डिलिव्हरी बॉय मरिन लाइन्स येथून अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या पाळीव श्वानाला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले.
मुंबई : मालक श्वानांना मुलांसारखे वागवत असतील परंतु श्वान मानव नाहीत, अशी टिप्पणी करत श्वानाला दुचाकीने धडक देणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉयवरील गुन्हा व आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
११ एप्रिल २०२० रोजी मानस गोडबोले हा फूड डिलिव्हरी बॉय मरिन लाइन्स येथून अन्नपदार्थांची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या पाळीव श्वानाला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. यातील जखमी पाळीव श्वानाचे निधन झाले. त्यामुळे मानसविरोधात मरिन लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मानसविरोधात आयपीसी कलम २७९, ३३७ आणि ४४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या संपूर्ण प्रकरणावर गुरुवारी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी ‘श्वान, मांजरांचे मालक त्यांचा सांभाळ मुलांप्रमाणे करतात. परंतु, मूलभूत जीवशास्त्र आपल्याला सांगते की, ते मनुष्य नाहीत. भारतीय दंड संहितेचे कलम २७९ आणि ३३७ मानवी जीवन धोक्यात आणणाऱ्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा इजा पोहोचविणाऱ्या कृतींशी संबंधित आहे,’ असे निरीक्षण मांडत न्यायालयाने राज्य सरकारला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम मरिन लाइन्स पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्या वेतनातून कापण्यात यावी, असे आदेश दिले.
‘श्वानाला जीवानिशी
मारण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. तसेच अर्जदार बेदरकारपणे गाडी चालवत होता, हे सिद्ध करणारे पुरावे सरकारी वकिलांनी सादर केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारावरील गुन्हा व आरोपपत्र रद्द करण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.