भावी डॉक्टरच्या घरात ड्रग्ज कारखाना; १० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:08 AM2024-01-12T10:08:31+5:302024-01-12T10:09:32+5:30
१ कोटी १७ लाखांचे एमडी जप्त, दोघांना ठाेकल्या बेड्या.
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरातच एमडी हे अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याचे मालवणी पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या कारवाईत दोघांना अटक करत १ कोटी १७ लाखांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.
अब्रार इब्राहिम शेख (३०) व नूर आलम मोहम्मद आलम चौधरी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ५ जानेवारीला मालवणी पोलिस ठाण्याच्या दक्षता पथकाने शेख यास अटक केली होती. त्याच्याकडून १ ग्रॅम एमडी व १०० थिनरची बाटली जप्त करण्यात आली होती. चौकशीत जप्त केलेले एमडी चौधरीकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारोती शेळके, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश साळुंके यांच्या पथकाने ९ जानेवारीला चौधरी याचा शोध घेण्यासाठी कांदिवलीतील चारकोप इस्लाम कंपाऊंड येथे छापा मारला. त्यावेळी नूर आलम मोहम्मद आलम चौधरी (२४) एमडी बनवताना आढळला.
१० बाय १० च्या खोलीत एमडीची निर्मिती :
नूर आलमने स्वतः एका खोलीतच एमडी बनविण्याचे काम सुरू केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्या १० बाय १० फुटांच्या खोलीत छापा टाकून एमडी तयार करण्याचे साहित्य, कच्चा माल आणि तयार करण्यात आलेले ५०० ग्रॅम शुद्ध एमडी हा अमली पदार्थ मिळून आला.
पोलिसांना खोलीत एक पुस्तक मिळाले. या पुस्तकात एमडीचा फॉर्म्युला आणि तयार करण्याची पद्धत देण्यात आली होती.
नूर आलम याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने बी.एच.एम.एस.ला नुकताच प्रवेश घेतला आहे. कांदिवली पश्चिमेतील इस्लाम कपाउंड भागात संघवी इस्टेट येथे कुटुंबासोबत राहणारा नूर आलम हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे. त्याचे वडील टॅक्सीचालक असून आई गृहिणी आहे. नूरला दोन भावंडे असून तो सर्वात मोठा आहे आहे. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे?, याबाबत अधिक तपास सुरू आहे.