रेश्मा शिवडेकर, विशेष प्रतिनिधी
परदेशात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात, तसे ते दारातील रद्दी उचलण्यासाठीही द्यावे लागतात. मग ही रद्दी वर्तमानपत्रांची असो वा वाचून झालेल्या बिनकामाच्या पुस्तकांची. परदेशात घराघरांतून नव्हे तर प्रकाशन संस्था, छापखाने, ग्रंथालये, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणांहून जमा होणाऱ्या रद्दीसाठी भारत ही डम्पिंग ग्राऊंड आहे. हीच रद्दी नंतर किलो किलोंच्या भावाने किंवा ५० ते ७० टक्के सवलतीत भारतीयांना उपलब्ध होते आणि आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढविते.
यात जसा डॅन ब्राऊन, पाउलो कोएलो असतो, तसा युवाल नोआ हरारी, चेतन भगतही असतो. कुठलाही लेखक, विषय भारतीय क्षेपणभूमीला व्यर्ज नाही. फक्त ते ‘बेस्टसेलर’ असले पाहिजे. आपल्याकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकांच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जी पुस्तके दिसतात ती याच प्रकारची.
किलोच्या भावाने वा ५० ते ७० टक्के सवलतीत उपलब्ध असलेली अशी पुस्तकांची प्रदर्शने शहरात अनेक ठिकाणी भरत असतात. रस्त्याच्या कडेला वा रेल्वेच्या पुलावर पथारीवर पसरूनही ती विकली जातात. एखादे बेस्टसेलर पुस्तक इतक्या कमी किमतीत विकणे कसे परवडते, असा प्रश्न सामान्यांना पडतो. त्यात पुस्तकावरील किमती डॉलर वा युरोमध्ये. कुठून येतात ही पुस्तके?
‘साहित्यजत्रा’च्या माध्यमातून पुस्तक प्रदर्शन आणि विक्री करणारे शैलेश वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सगळी परदेशातील रद्दी आहे. तिथे रद्दी म्हणून टाकून दिलेली ही पुस्तके कंटेनर भरभरून भारतात येतात. तसेच एखाद्या पुस्तकाच्या प्रती किती काळ ठेवायच्या हे प्रकाशकांचे गणित निश्चित असते. हा काळ संपला की, ही पुस्तके अतिशय स्वस्तात वा चक्क रद्दीत विकली जातात. भारतात काही ठरावीक विक्रेते ठोक पद्धतीने ही पुस्तके विकत घेतात. त्यांच्या विषयवार विभागणी करतात आणि तेथून ती भारतभर विक्रीला पाठविली जातात. भारतात २००० पासून पुस्तकांचा हा बाजार बहरू लागला आहे.
मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर सांगतात त्याप्रमाणे यात पायरेटेड पुस्तकेही असतात. छपाईचे तंत्र इतके विकसित झाले आहे की, यातील बनावट प्रति ओळखूनही येत नाहीत.
अशा प्रदर्शनांमध्ये म्हणूनच मराठी प्रकाशकांची पुस्तके अभावानेच आढळून येतील. कारण इतक्या स्वस्तात पुस्तके विकणे प्रकाशकांना परवडत नाही. त्यामुळे या पुस्तकांवर फार तर ५ ते १० टक्क्यांची सवलत देता येते, असे वाजा यांनी सांगितले.
५०,००० पुस्तकांचे एक कंटेनर
एका कंटेनरमध्ये ५० हजार पुस्तके असतात. यातील विक्रीमूल्य असलेली पुस्तके निवडून ती वेगळी केली जातात. इतर चक्क रद्दीत काढली जातात. त्यासाठीची यंत्रणा संबंधित व्यापाऱ्यांकडे असावी लागते. भारतात डॅन ब्राऊनसारखे लोकप्रिय परदेशी लेखक, लहान मुलांची पुस्तके हातोहात खपतात. एका कंटेनरमागे विक्रेत्याला ५ ते १० टक्के नफा निश्चतपणे होतो. भिवंडीला या पुस्तकांची अनेक गोडाऊन आहेत.
पुस्तके येतात कुठून ?
घराघरांतून बिनकामाची, रद्दी म्हणून टाकून दिलेली
शाळा, महाविद्यालये, ग्रंथालयातील नको असलेली पुस्तके
छापखान्यातील अतिरिक्त पुस्तके
सुधारित आवृत्तीमुळे प्रकाशकांकडील राहिलेली जुन्या आवृत्तीची पुस्तके. मागणीच नसलेली, शेल लाईफ संपलेली अशी पुस्तके.