मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये देश-परदेशातील कलाकारांचा मेळा!
By स्नेहा मोरे | Published: January 12, 2024 06:46 PM2024-01-12T18:46:29+5:302024-01-12T18:47:17+5:30
शहर उपनगरातील म्हणजे जुहू ते कुलाबा परिसरातील ३४ कलादालनांनी मिळून या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
मुंबई- देश परदेशातील कलाकारांनी एकत्र येत सुरु केलेल्या मुंबई गॅलरी वीकेंडमध्ये एकाच वेळी विविध शाखेतील कला सृजनशील पद्धतीने कला रसिकांना पाहायला मिळणार आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे, पहिल्यांदाच कोविड काळातील समुद्राच्या संगीतासह असलेली दृकश्राव्यफित या उपक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे. या कलाकृतीचे नाव बॉम्बे टिल्ड डाऊन असे असून पहिल्यांदाच ऑडिओ व्हिज्युअल कलाकृती अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
शहर उपनगरातील म्हणजे जुहू ते कुलाबा परिसरातील ३४ कलादालनांनी मिळून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून कलाविषयक कार्यशाळा, सेमिनार, व्याख्यान, प्रात्यक्षिकांची संधी नवोदितांना मिळणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून छायाचित्रकार हेमंत चतुर्वेदी यांचे छायाचित्र प्रदर्शन काळा घोडा कॅफेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील मुहान्नद कॅडर आणि धारावी येथील अनंत जोशी यांच्या कलाकृतीही पाहायला मिळणार आहे. तर इव्होल्युशन ऑफ नाव या प्रदर्शनांतर्गत रितू अगरवाल, शीना बजारिया, पवन कविटकर , कौशिक सहा, मीरा जॉर्ज , पूर्वी राय, अक्षता मोक्षी आणि धीरज यादव यांच्या चित्र - शिल्पकृतींचा समावेश आहे.
या उपक्रमातील कलाकृती १४ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहेत. या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी कला रसिकांसह विद्यार्थ्यांना सिमरोझा कला दालन, कमलनयन बजाज कला दालन, गॅलरी आर्ट अँड सोल, ताओ आर्ट गॅलरी, ताज पॅलेस गॅलरी, गॅलरी एक्सएक्सएल, नाईन फिश आर्ट गॅलरी, गॅलरी मस्कारा, साक्षी गॅलरी, प्रोजेक्ट ८८, तर्क गॅलरी, प्रियांशी आर्ट गॅलरी, मेथड जुहू, द डॉट लाईन स्पेस दालनांना भेट द्यावी लागेल.