मुंबई - शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकेड गेल्या १७ वर्षांपासून काम करणाऱ्या गाडी चालकाने १ कोटी रुपये घेऊन धूम ठोकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् आरोपीला अकोल्यातून अटक केली. ११ ऑक्टोबर रोजी आपल्या मालकाकडील १ कोटी रुपये चोरून कारसह पळून गेलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी अकोला जिल्ह्यातून अटक करण्यात आली. संतोष चव्हाण असं आरोपीचं नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत त्याला पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपी चव्हाणकडून ३६ लाख रुपये आणि चोरीची कार जप्त केली आहे. आरोपी चव्हाण हा बांधकाम व्यवसायिक धीरेंद्र अमितलाल शेठ यांच्याकडे गेल्या १७ वर्षांपासून काम करत होता. गेल्या आठवड्यात तो मालकासोबत जोगेश्वरी येथील उपनिबंधक कार्यालयात गेला. त्यावेळी, फिर्यादी मालकाने आरोपीं चव्हाण यास २५ लाख रुपये देऊन गाडीत बसण्यास सांगितले होते. मात्र, धीरेंद्र हे निबंधक कार्यालयातून परतल्यावर त्यांची गाडी आणि चालक चव्हाण दोघेही न सापडल्याने शेठ यांना धक्काच बसला. त्यानंतर, शोधा शोध करुनही तो न सापडल्याने शेठ यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, आरोपीने बिल्डर धीरेंद्र शेठ यांच्या कार्यालयातूनही ७५ लाख रुपये घेऊन धूम ठोकल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी चव्हाणने मेहुणा प्रदीप यादवच्या आधार कार्डद्वारे नवीन सीमकार्ड व मोबाईल खरेदी केला. दरम्यान, त्याने आळंदी येथील नातेवाईकाकडे ५० रुपये ठेवले होते. दरम्यान, आरोपीला पत्नी आणि मुलांसह अकोल्यातून अटक करण्यात आली.
पोलीस तपासादरम्यान चव्हाण पत्नी आणि मुलांसह अकोल्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांचे विशेष पथक अकोल्याला रवाना करण्यात आले, अकोला पोलिसांच्या मदतीने आरोपी चव्हाणला पकडण्यात यश आले. त्याला मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.