गौरी टेंबकर,मुंबई : एआय वर्कशॉपचे सर्टिफिकेट मिळवताना एक फॅशन डिझायनर टास्क फ्रॉडच्या जाळ्यात अडकली. यात त्यांना लाखो रुपयांचा चुना लावण्यात आल्यावर विलेपार्ले पोलिसात अनोळखी भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हेतश्री फर्नांडिस (४१) या व्यवसायाने फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मार्च रोजी त्या त्यांच्या घरी असताना त्यांना एआय टूल वर्कशॉप या नावाने एक जाहिरात दिसली. त्यावेळी त्यांनी त्या लिंकवर क्लिक करत सदर वर्कशॉप साठी रजिस्ट्रेशन केले जे १० मार्च रोजी होणार होते. त्यामध्ये झुम मीटिंगची एक लिंक दिली होती. त्यानुसार त्यांनी ती क्लिक केली तेव्हा त्यांना संबंधित वर्कशॉप बाबत माहिती दिली गेली आणि त्याच्या सर्टिफिकेटसाठी त्यांना पुन्हा नवी लिंक देण्यात आली. तसेच यादरम्यान त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपमध्येही ॲड केले गेले आणि ज्यात पार्टटाइम जॉबसाठी मेसेज आले होते.
या मेसेजमध्ये विविध कंपन्यांची नावे दिलेली असल्याने त्या लिंकमध्ये जाऊन रिव्ह्यू किंवा फाईव स्टार रेटिंग करण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर तीन रिव्ह्यूसाठी १५० रुपये दिले जातील असेही सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने सदर टास्कमध्ये थोडे थोडे करत १ लाख ६२ हजार रुपये भरले. मात्र त्यांना खोट्या टास्क देत त्यांची फसवणूक करण्यात आली आणि या विरोधात अखेर विलेपार्ले पोलिसात त्यांनी तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला.