मुलासाठी बूट आणायला गेलेल्या वडिलांचा दुचाकी अपघातात मृत्यू
By मनीषा म्हात्रे | Published: October 2, 2022 08:43 PM2022-10-02T20:43:29+5:302022-10-02T20:43:57+5:30
शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अभिजीत हे ७ वर्षीय मुलाला शाळेसाठी लागणारे बूट आणण्यासाठी चेंबूरमध्ये गेले होते.
मुंबई: मुलाला शाळेसाठी लागणारे बूट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वडिलांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी गोवंडीत घडली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालक चिदमबरनाथन सुब्रमन्यम (४५) याला बेड्या ठोकल्या आहेत.
ट्राॅम्बेमधील कस्टम रोड परिसरात राहण्यास असलेल्या अभिजीत कावले (३७) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी अन्यना कावले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. अभिजित हे वरळी येथील धर्मादाय कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अभिजीत हे ७ वर्षीय मुलाला शाळेसाठी लागणारे बूट आणण्यासाठी चेंबूरमध्ये गेले होते.
सायन-ट्रॉम्बे रोडवरुन घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने अभिजीत यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात अभिजीत हे गंभीर जखमी झाले. घटनेची वर्दी लागताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कार चालकाला ताब्यात घेतले. तसेच, जखमी अवस्थेतील अभिजीत यांना तात्काळ उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डाॅक्टरांनी अभिजीत यांना मृत घोषीत केले. या घटनेने कावले कुटुंबियांना धक्का बसला आहे.