लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (मिफ्फ) एनसीपीएमध्ये शनिवारी सुरुवात झाली. उद्घाटन समारंभात 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांचा 'सनफ्लॉवर्स वॉज फर्स्ट वन टू नो' हा लघुपट दाखवण्यात आला. २१ जूनपर्यंत सुरू राहणार असलेल्या या महोत्सवात ६१ भाषांतील ३१४ चित्रपट दाखविले जाणार आहेत. 'मिफ्फ'ची सुरुवात राष्ट्रगीत, गणेशवंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एल. मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेता रणदीप हुडा, दिव्या दत्ता, सोनाली कुलकर्णी, अभिषेक बॅनर्जी, दिव्येंदू, पंकज झा, सौरभ सचदेवा, दिग्दर्शक मधुर भांडारकर, आनंद एल. राय, किरण शांताराम, 'नेटफ्लिक्स'चे आदित्य कुट्टी आदी मंडळी हजर होती.
सुब्बिया नल्लामुथु यांना 'व्ही. शांताराम जीवनगौरव' या सोहळ्यात वन्यजीव चित्रपट निमति सुब्बिया नल्लामुथु यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुब्बिया यांनी हा पुरस्कार कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांना अर्पण केला.
डॉक फिल्म बाजार
■ यंदाच्या महोत्सवात पहिल्या- वहिल्या डॉक फिल्म बाजार सादर करण्यात येत आहे. ज्यात माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपटांसाठी समर्पित बाजारपेठ असेल. यामुळे या प्रभावी माध्यमांमधील समन्वय आणि विकासाला चालना मिळेल.
■ यंदा डॅनिएला वोल्कर दिग्दर्शित 'द कमांडंट्स शेंडो' या मिडफेस्ट चित्रपटाची निवड केली आहे.
■ यंदा प्रथमच स्क्रीनिंग आणि रेड कार्पेट सोहळा मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि दिल्ली या पाच शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित केला आहे.
४२ लाख रुपयांचे पुरस्कार
महोत्सवात ५९ देशांतील ६१ भाषांमधील ३१४ चित्रपट, ८ जागतिक प्रीमियर, ५ आंतरराष्ट्रीय प्रीमियर, १८ आशिया प्रीमियर आणि २१ भारतीय प्रीमियर होणार आहेत. ६० देश त्यांच्या चित्रपट आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. या महोत्सवात ४२ लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत