वाहन विक्रीचा गीअर बदलणारा सणासुदीचा काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:09 PM2024-10-14T12:09:25+5:302024-10-14T12:10:21+5:30
यंदाही तसेच संकेत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात वाहन उद्योगाकडून आकर्षक सवलतींचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे गणेशोत्सव ते दिवाळी हा सणासुदीचा कालावधी वाहनविक्रीचा गीअर बदलणारा काळ समजला जातो. यंदाच्या वाहनखरेदीकडे पाहिले असता, तो सार्थ असल्याचे दिसून येते.
महेश कोले, प्रतिनिधी -
देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहन उद्योगाचा मोलाचा वाटा आहे. वाहन खरेदीचा कल हा देशवासीयांचा मूड कसा आहे, हे दर्शवतो. साधारणत: पाऊस चांगला पडला की वाहनखरेदीचा उत्साह वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जातो.
यंदाही तसेच संकेत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात वाहन उद्योगाकडून आकर्षक सवलतींचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे गणेशोत्सव ते दिवाळी हा सणासुदीचा कालावधी वाहनविक्रीचा गीअर बदलणारा काळ समजला जातो. यंदाच्या वाहनखरेदीकडे पाहिले असता, तो सार्थ असल्याचे दिसून येते.
खरेदीसाठी शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती दिली जाते.
यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर महामुंबईतील नागरिकांनी १७७३८ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी केली. ३ ते १२ ऑक्टोबर या नवरात्रोत्सवाच्या कालावधीत महामुंबईतील मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी आणि पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये या गाड्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा वाहनखरेदीचा उत्साह ओसंडून वाहत होता, असेच म्हणावे लागेल.
सवलतींचा पाऊस
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी विविध सवलती दिल्या होत्या. दुचाकी- बाइक्सवर तीन ते पाच हजारांपर्यंत सूट देण्यात येत होती, तर चारचाकी कारवर २० ते ८० हजारांपर्यंतच्या सवलती इन्शुरन्स, कमी ईएमआय आणि एक्स्चेंज तसेच स्क्रॅपेज बोनस आदी माध्यमांतून देण्यात आले होते.
- शहरात होणारी वाहतूककोंडी, लोकलमधील वाढती गर्दी, तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जलद आणि सोईस्कर प्रवासासाठी नागरिकांनी दुचाकीला सर्वाधिक पसंती दर्शवल्याच्या दसऱ्याच्या वाहनखरेदीवरून निदर्शनास येते. चारचाकींच्या तुलनेत दुचाकींची ३९ टक्के अधिक नोंदणी झाली आहे. महामुंबईत १२ हजार ७५६ दुचाकींची, तर ४ हजार ९७३ कार्सची नोंदणी झाली.
नवरात्रोत्सवातील वाहन नोंदणी
शहर बाइक कार एकूण
मुंबई सेंट्रल (ताडदेव) १९२१ ८२३ २७५३
मुंबई पूर्व (वडाळा) १५१० ६५४ २१६४
मुंबई पश्चिम (अंधेरी) १४८१ ७३२ २२१३
नवी मुंबई ९१६ ४७३ १३८९
पनवेल १३४५ ७३७ २०८२
ठाणे २८७३ ९५३ ३८२६
कल्याण २७१० ६०१ ३३११