पुन्हा अग्नितांडव! लालबागच्या अविघ्न इमारतीत ३५ व्या मजल्यावर लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:20 AM2022-12-15T11:20:06+5:302022-12-15T11:20:27+5:30
अविघ्न इमारतील लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारत रिकामी करण्याचं काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे.
मुंबई - लालबाग येथील अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी पोहचले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात आणण्याचा अग्निशमन जवान प्रयत्न करत आहेत.
अविघ्न इमारतील लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारत रिकामी करण्याचं काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. मात्र आगीचे लोळ १-२ किमी अंतरावरून दिसत आहेत. गेल्यावर्षीही या इमारतीत आग लागल्याची दुर्घटना घडली होती. त्यावेळी एका व्यक्तीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून उडी घेतली होती. मात्र त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वारंवार या इमारतीला आग लागत असल्याने या इमारतीचं फायर ऑडिट झालंय का असा प्रश्न निर्माण होतो.
VIDEO: मुंबईतील 'वन अविघ्न' इमारतीत पुन्हा आग, इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर आग भडकली pic.twitter.com/wMX2TrpmhB
— Lokmat (@lokmat) December 15, 2022
आगीच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आग कशामुळे लागली यावर अद्याप स्पष्टता नाही. ३५ व्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वरच्या मजल्यावरील रहिवाशांचा जीव वाचवण्याचा जवान प्रयत्न करत आहेत.
गेल्यावर्षीही १९ व्या मजल्यावर लागली होती आग
करी रोड येथील माधव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमधील १९ व्या मजल्याला २०२१ मध्ये आग लागली होती. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेव्हल ४ आग असल्याचं जाहीर करण्यात आले होते.