Join us

मुंबईत उसळतोय आगडोंब; गेल्या ३ वर्षांत ११ हजार फायर कॉल्स; उपायांची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 12:28 PM

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत आगीशी संबंधित ३ हजार १२५ कॉल्स रेकॉर्ड करण्यात आले. यामध्ये आर. ए. रेसिडेन्सी, कुर्ला येथील एसआरए बिल्डिंग येथे आगीच्या मोठ्या घटनांची नोंद झाली. गेल्या तीन वर्षांच्या माहितीनुसार आगीशी संबंधित घटनांचे एकूण ११ हजार ६०७ कॉल्स आल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या आगीच्या घटना का वाढल्या आहेत? सदोष वीज जोडणीमुळे मुंबईत आगीच्या घटना वाढत असतील, तर त्याची चाचपणी का केली जात नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आगीत गुदमरून मृत्युमुखी पडल्याच्या किंवा रुग्णालयात भरती कराव्या लागल्याची उदाहरणे अधिक आहेत. गेल्या आठवड्यात दादरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत एका ६० वर्षीय मानसोपचार तज्ज्ञांचा गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर उंच इमारतींमध्ये, जिथे बाहेर पडण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसते तिथून लोकांना बाहेर काढणे कठीण असल्याचे मत नोंदविले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील उंच इमारतीतील आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास तेथून बाहेर पडण्यासाठी पर्यायी उपायांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

मुंबई अग्निशमन दल सज्ज

  सध्या मुंबईत बचाव कार्यासाठी ३५ अग्निशमन केंद्र आणि १९ मिनी, अग्निशमन केंद्रे आहेत.

  आगीच्या घटनांच्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी अलीकडेच प्रभाग स्तरावर २२ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल्स सुरू केली आहेत.

  या वाहनांमध्ये हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, फायर इंजिनच्या आत पाण्याची टाकी आणि बचाव वाहन असेल.

  त्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच मुंबई अग्निशमन विभागाकडे बचाव कार्यासाठी अशा प्रगत गाड्या असतील, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी आर. एन. अंबुलगेकर यांनी दिली.

अग्निशमन

उपकरणे पडून

अनेक इमारतींत आग प्रतिबंधक उपकरणे असतात. परंतु त्याची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने आणि त्याची मुदतही उलटून गेल्याने ती पडून राहतात.

अनेकदा याचा वापर नेमका कसा करतात, हेही माहीत नसते. काही टोलेजंग इमारतीत अग्निशमन यंत्रणा नसते.

गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये अशा शेकडो इमारतींना नोटीस बजावूनही यंत्रणा बसविण्याच्या सूचना अग्निशमन दलाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही इमारतींनी ही यंत्रणाही बसविल्याची माहिती देण्यात आली.